पाटणा - पोलिसांच्या अक्षम्य चुकीमुळे मिठाई दुकानदारास विनाकारण तुरुंगात एक रात्र घालवावी लागली आहे. पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला लढणाऱ्या मिठाई दुकानदारास पोलिसांना इंग्रजी न समजल्याचा फटका बसला. न्यायालयाच्या आदेशावर लिहिण्यात आलेल्या वॉरंटला पोलीस अटक वॉरंट समजले. त्यामुळे पोलिसांनी पीडित पतीला एक दिवस तुरुंगात डांबून ठेवले होते.
बिहारमधील जहानाबाद येथे ही घटना घडली असून नीरज कुमार असे पीडित पतीचे नाव आहे. नीरज यांचा आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाबाबत खटला सुरू आहे. नीरज हे आपल्या पत्नीला पोटगी देऊ शकत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने संपत्तीची माहिती देण्यासाठी त्यांना वॉरंट बजावले होते. मात्र, पोलिसांनी चुकीने या वॉरंटला अटक वॉरेंट समजले. त्यानंतर, नीरज यांना पाटणा कुटुंब न्यायालयात हजर केले. तेथे न्यायाधीशांना पोलिसांची चूक लक्षात आली. त्यामुळे नीरज यांची तात्काळ सुटका करण्यात आली.
न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या या वॉरंटला डिस्ट्रेस वॉरंट असे म्हणतात. यामुळे पतीच्या एकूण संपत्तीच्या मूल्यांकनाची माहिती मिळते. मात्र, याप्रकरणात पोलिसांनी या वॉरंटला अटक वॉरंट समजून नीरज यांना अटक केली. दरम्यान, नीरज यांच्याकडून पत्नीला दरमहा 2500 रुपये भत्ता देण्यात येतो. मात्र, पती नीरज यांच्याकडून गेल्या अनेक महिन्यांपासून हा भत्ता देण्यात आला नव्हता.