चंदिगड, दि. 1 - बलात्काराच्या आरोपाखाली कारागृहात रवानगी झालेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला जेलमध्ये इतर कैद्यांपासून लांब ठेवण्यात आलं आहे. राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे कारागृहातील कैदी संतापले असून ते राम रहीमवर हल्ला करण्याची भीती आहे अशी माहिती जामिनावर बाहेर आलेल्या कैद्याने दिली आहे.
स्वदेश किरड नुकताच जामिनावर बाहेर आलेला आहे. राम रहीमसोबत त्याने काही दिवस घालवल्याने नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती त्याने दिली. त्याने सांगितलं की, राम रहीमला कोणतीही विशेष वागणूक दिली जात नसून सुरक्षेसाठी त्याला स्वतंत्र ठेवण्यात आलं आहे.
'त्याच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचार आणि झालेले मृत्यू यामुळे कैदी प्रचंड संतापले आहेत. जर त्याला वेगळं ठेवलं नाही तर कदाचित ते त्याच्यावर हल्ला करतील', असं स्वदेश किरड याने सांगितलं आहे. स्वदेश किरड याने राम रहीमसोबत जेलमध्ये पाच दिवस घालवले आहेत. रोहतकमधील सोनारिया जेलमध्ये राम रहीम शिक्षा भोगत आहे.
'ज्या दिवशी राम रहीमला कारागृहात आणण्यात आलं तेव्हा तो वारंवार देवा माझी काय चूक आहे ? पुटपुटत होता', असं स्वदेश किरड याने सांगितलं आहे. तसंच रात्रभर तो ना काही खाऊ शकला, ना झोपू शकला. आपल्याला शिक्षा झाली आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता', अशी माहिती स्वदेश किरड याने दिली आहे. 'मी पाच दिवस जेलमध्ये होतो यादरम्यान त्याने काहीच खाल्लं नाही. फक्त दूध आणि बिस्किटं घेतली', असं स्वदेश किरड याने सांगितलं.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. राम रहीम याला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचबरोबर, राम रहीमला न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमधे प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, या दंडाच्या रकमेतील दोन्ही पीडितांना प्रत्येकी 14 लाख रुपये देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यान, राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता.