चंडीगड : ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा नवव्या दिवशीही शोध सुरूच आहे. पाच राज्यांचे पोलिस त्याच्या मागावर आहेत. नेपाळ सीमेवर मोस्ट वाँटेड म्हणून त्याचे पोस्टर्सही लावले आहेत. त्याचे शेवटचे लोकेशन उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे सापडले आहे.
अमृतपाल सीमा ओलांडून नेपाळमध्ये जाऊ नये म्हणून सशस्त्र सीमा दलाने सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, चौक्यांवर नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. अमृतपालने खासगी सैन्याला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमधून रायफली मागवल्या होत्या. अमृतपालला फौज व टायगर फोर्सला प्रशिक्षित करण्यासाठी एका पाकिस्तानच्या निवृत्त मेजरच्या संपर्कात होता. (वृत्तसंस्था)
कोडवर्डचा वापर
अमृतपाल मोबाइल संभाषणात कोडवर्डचा वापरत असून, लोकेशन समजू नये म्हणून तो मोबाइल फ्लाईट मोडवर ठेवत असल्याचे त्याला आश्रय देणाऱ्या महिलेने सांगितले.
अमृतपालला आश्रय देणारी आणखी एक महिला गजाआड
- पंजाब पोलिसांनी फरार फुटीरवादी अमृतपाल सिंग व त्याच्या साथीदाराला आश्रय दिल्याप्रकरणी पतियाळाच्या महिलेला अटक केली.
- अमृतपाल व त्याचा साथीदार पापलप्रीत सिंग हे दोघे बलबीर कौर यांच्या घरी थांबले होते.
- कौर यांनी दोघांना कथितरीत्या आश्रय दिला व त्यानंतर ते हरयाणाच्या शाहाबादला रवाना झाले.