रामपूरः समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात 13 प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल केली आहे. तसेच माजी खासदार जया प्रदाही कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्यांच्याविरोधातही सहा चार्जशीट दाखल झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांनी शाहबादमध्ये एका जनसभेला संबोधित करतानाही जया प्रदा यांच्याबद्दल अश्लील टिपण्णी केली होती.या प्रकरणातही कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी कानपूरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते प्रकरणात रामपूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर बंदी घातली असतानाही ते वादग्रस्त विधानं करतच होते. निवडणूक आयोगानं त्यांच्याविरोधात आचारसंहितेचं उल्लंघन आणि वादग्रस्त भाषणबाजीसंदर्भात जवळपास 15 खटले दाखल केले आहेत. पोलिसांनी चौकशी पूर्ण केली आझम खानविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
- जया प्रदाविरोधात आरोपपत्र दाखल
माजी खासदार आणि चित्रपट अभिनेत्री जया प्रदा लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार होत्या. निवडणुकीदरम्यान त्यांच्याविरोधात सहा गुन्हा दाखल झाले आहेत. त्यांच्यावर मुलांना ट्राफी वाटणं आणि दहा रुपये देण्याचा आरोप आहे. पोलिसांनी चौकशीनंतर आरोपपत्र दाखल केलं आहे.
- संसदेत महिलांसंदर्भात केलं वादग्रस्त विधान
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांच्या विधानानं वाद झाला होता. तिहेरी तलाकवर चर्चा सुरू असताना रामपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या निवडून आलेले खान बोलायला उभे राहिले. त्यांनी ‘तू इधर-उधर की ना बात कर…’ असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपाच्या खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. 'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला होता.