भोपाळ/इंदौर : पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन मंगळवारी हिंसक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यासह अनेक वाहनांना आगीच्या हवाली केले. गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू करण्यासह इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, राज्य सरकारने गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मंदसौर जिल्ह्यातील दलौदा येथे संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांत चकमक तसेच दगडफेक झाली. एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आठ मालमोटारी (ट्रक) आणि दोन दुचाकींना आगीच्या हवाली केले आणि पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दगडफेकही केली. >सरकार ‘गोळ्या’ भरवतेय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरून मंगळवारी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारचे शेतकऱ्यांशी युद्ध सुरू असून, ते आपले हक्क मागणाऱ्या अन्नदात्यांना बंदुकीच्या गोळ्या भरवत आहे, असे ते म्हणाले. मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराबाबत बोलताना राहुल म्हणाले की, हे सरकार आमच्या देशातील शेतकऱ्यांशी युद्ध करीत आहे. भाजपच्या नव्या भारतात आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या बदल्यात गोळ्या मिळत आहेत, असे टष्ट्वीट राहुल यांनी केले.
मध्य प्रदेशात पोलीस गोळीबार; ५ शेतकरी ठार
By admin | Published: June 07, 2017 4:46 AM