अथणी (जि. बेळगाव) : अथणी शहरातील विक्रमपूरमधील हुलगबाळी रस्त्यावरील असणाऱ्या विजय देसाई यांच्या दोन मुलांचे गुरुवारी दुपारी अपहरण केले. त्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली. कोहली-सिंधूर रस्त्यावर अपहरणकर्त्यांना पकडतांना चकमक झाली. पोलिसगोळीबारात एक जखमी झाला; तर प्रतिहल्ल्यात उपनिरीक्षक व दोन कर्मचारी जखमी झाले. या थरारनाट्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांची सुटका करून त्यांना आई-वडिलांच्या ताब्यात दिले.संशयित संभाजी कांबळे (रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), रविकिरण कमलाकर (रा. अंकली, ता. चिकोडी), शाहरूख शेख (मूळ राज्य बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन मुलांना पालकांच्या ताब्यात दिले. उपनिरीक्षक उपार, पोलिस कर्मचारी रमेश हादीमनी, जमीर डांगे जखमी झाले आहेत.गुरुवारी दुपारी २ वाजता विजय देसाई यांची दोन चिमुकली मुले घरात खेळत होती. तेव्हा अनोळखी तिघे जण पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आले. दोन मुलांना घरात घुसून मोटारीतून जबरदस्तीने नेताना आरडाओरडा झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. देसाई यांना हा प्रकार समजताच तातडीने अथणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवून नाकाबंदी केली.अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग करून संशयितांना पकडताना झटापट झाली. संशयितांनी दगडफेक केली. दोघे सापडले. एकटा पळू लागला. त्याच्या पायावर गोळीबार केला. तो जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. या झटापटीत उपनिरीक्षक व दोन पोलिस जखमी झाले. जखमी होऊनही त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून संशयित तिघांनाही अटक केली.
पोलिसांचा अपहरणकर्त्यांवर गोळीबार, तिघे पोलिस जखमी; अथणीजवळ थरारनाट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:34 PM