मथुरा, दि. 24- आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग 2 वर असणाऱ्या टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी मथुरामधील सहा पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली आहे. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी तसंच तेथिल चाळीस हजार रूपयांची रोखरक्कम लुटल्या प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी टोलनाक्यावर घातलेला धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पण या घटनेनंतर कुठल्याही पोलिसाने या प्रतिक्रिया दिली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सर्कल ऑफिसर नितीन सिंह फरह इथून मथुराच्या दिशेने जात होते. महुअन टोलनाक्याच्या बूथ 13 जवळून त्यांती गाडी जात असताना तेथे असलेला बॅरिअर त्यांच्या गाडीवर पडला. त्यामुळे सीओ नितीन सिंह यांचा पार चढला. यानंतर सीओ आणि त्यांच्यासोबत असलेले इतर पोलीस गाडीतून उतरले आणि त्यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांसह वाद घालायला सुरूवात केली. हा सगळा प्रकार सुरू असताना तेथे असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने टोल बूथमध्ये असणाऱ्या पैशांवर डल्ला मारला. तो पोलीस कर्मचारी बूथमधून पैसे उचलताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी बूथमधील पैसे नेले असा आरोप टोलकर्मचारी करत आहेत. पोलीस आणि टोल अधिकारी यांच्यातील बाचाबाची एक तास चालली. पण एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी त्या टोलनाक्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाणही केली, असा आरोप होतो आहे.
मथुरामधील सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, यामध्ये सर्कल ऑफिसरचाही समावेश आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये सादर करण्यात आलं आहे, अशी माहिती, टोल नाक्याचे सहाय्यक व्यवस्थापक ओ.के यादव यांनी दिली आहे. 22 ऑगस्टच्या रात्री 11.45 ते 1 वाजेच्या सुमारस ही घटना घडली, असंही त्यांनी सांगितलं.
पण सर्कल ऑफिसर नितीन सिंह यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी आणि माझे सहकारी ड्युटीवर असताना टोलचे कर्मचारी टोलसाठी जास्त पैशांची मागणी करत होते, अशी तक्रार तीन लोकांनी आमच्याकडे केली होती. त्यावर आम्ही टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना विचारल्यावर ते भडकले आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, अस नितीन सिंह यांनी सांगितलं.