जाजपूर: ओडिशाच्या जाजपूरमध्ये दहा कापलेले हात सापडल्यानं एकच घबराट पसरली आहे. 2006 मध्ये या भागात पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आदिवासींवर गोळीबार केला होता. हे हात त्याच आंदोलकांचे असावेत, अशी शक्यता प्राथमिक तपासातून समोर आली आहे. सध्या या परिसरात दहशतीचं वातावरण असल्यानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. कलिंगा नगरमधील स्टिल कारखान्यासाठी जानेवारी 2006 मध्ये जमिनीचं अधिग्रहण सुरू असताना त्याविरोधात स्थानिक आदिवासींनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये 13 पेक्षा अधिक आदिवासींचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासींचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यावेळी पाच मृतदेहांची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्यांचे हात कापून त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आदिवासींच्या कुटुंबियांना मृतदेहांचे हात परत देण्यात आले. मात्र त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी या हातांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे हे हात एका मेडिकल बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी काहीजणांनी क्लबची खिडकी तोडली आणि त्यांनी मेडिकल बॉक्स पळवला, अशी माहिती एसपी सी. एस. मीना यांनी दिली. त्या मेडिकल बॉक्समध्ये दहा हात ठेवण्यात आले होते. हात पळवणाऱ्या माणसांनी ते जाजपूरमध्ये नेऊन फेकले. स्थानिक लोकांना हे हात सापडल्यावर एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांनी या भागात मोठा फौजफाटा तैनात केला. मात्र अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही.
ओडिशात सापडले 10 कापलेले हात; परिसरात घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 3:36 PM