नवी दिल्ली - आजच्या काळात लोकांना स्वतःच्या फायद्याशिवाय कशाचीच पर्वा नाही. लहानसहान कामातही त्यांचा फायदा दिसत नाही तोपर्यंत ते करत नाहीत, अशावेळी कोणी निस्वार्थीपणे गरजूंना मदत केली तर खरच नवल. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्यांनी लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. इंदूरच्या पोलीस कर्मचार्यांनी असं काम केलं, ज्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
कडक उन्हात रस्त्यावर सायकलवरून फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला पाहून इंदूरचे पोलीस भावुक झाले. त्यांनी तरुणासाठी पुढाकार घेतला. सर्वांनी मिळून पैसे गोळा केले आणि 22 वर्षीय कर्मचाऱ्याला मोटारसायकल विकत घेतली. लोकांच्या घरी खाद्यपदार्थांचे पार्सल पोहोचवण्यासाठी त्या मुलाला सायकलवरून जात मेहनत करताना पोलिसांनी पाहिले होतं. विजय नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या गस्तीदरम्यान त्यांनी जय हल्दे या तरुणाला मध्य प्रदेशात खाद्यपदार्थांचे पार्सल पोहोचवण्यासाठी सायकलवरून जाताना पाहिलं.
तरुणासोबत बोलल्यानंतर आम्हाला कळलं की त्याचं कुटुंब आर्थिक समस्यांना तोंड देत आहे आणि त्याच्याकडे मोटरसायकल घेण्यासाठी पैसे नाहीत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तहजीब काझी आणि विजय नगर पोलीस स्टेशनच्या इतर काही कर्मचार्यांनी ऑटोमोबाईल शोरूममध्ये प्रारंभिक पेमेंट करण्यासाठी पैसे दिले आणि जय हल्देसाठी मोटारसायकल खरेदी केली. जय हल्देने पूर्वी मी सायकलवर सहा ते आठ खाद्यपदार्थांची पार्सल पोहोचवत असे, पण आता मोटारसायकलवरून फिरताना एका रात्रीत जास्त पार्सल पोहोचवत आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.