मुंबई - महाराष्ट्रात राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात एकप्रकारे लॉकडाऊनच लागू झाला आहे. त्यामुळे, गोरगरीब आणि करुन खाणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. हातावरचं पोट असलेल्यांना या लॉकडाऊनमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील नालासोपारा येथे रस्त्यावर फुलं विकणाऱ्या आजीला पाहून पोलीसही गहिवरले अन् आजीला 500 रुपये देऊन घरी जाण्यासं सांगितलं, अशी पोस्ट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे झारखंडच्या आमदारांनीही त्याप्रकारची पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या घटनेचं सत्य वेगळंच आहे.
झारखंडमधील आमदार सीता सोरेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुंबईतील फुल विकणाऱ्या आजीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत घडलेल्या घटनेची माहितीही त्यांनी दिलीय. राज्यात कडक निर्बंध असल्याने सर्वच दुकाने बंद आहेत. सर्व विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, एक फुलवाली आजी फुलांचे हार विकताना दिसत आहे. या आजीला पोलिसांनी लॉकडाऊन असल्याने घरी जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावर, जर हे फुलं विकली नाहीत, तर मी काय खाणार असा भावनिक सवाल या आजीने पोलिसांना केला. त्यावर, पोलिसांनाही गहिवरलं. त्यानंतर, पोलिसांनी जवळचे 500 रुपये देऊन आजीला घरी जायला सांगितलं. मात्र, ही माहिती पूर्ण पणे खोटी आहे. तसेच, या फोटोसह व्हायरल होणारे कॅप्शनही असत्य असल्याचं या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि ज्यांनी हा फोटो काढला ते फोटोग्राफर महेश गोहिल यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.
या वृद्ध महिलेच्या मुलाशीही आम्ही संपर्क साधला असता, आम्ही नालासोपारा येथील दत्त चौकात राहतो. माझं छोटसं चप्पलचं दुकान आहे, सध्या लॉकडाऊनमुळे ते बंदच आहे. माझ्या आईला मी घरी थांबवण्याचं वारंवार सांगतो, पण ती कुणाचंही ऐकत नाही. आईच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला आहे. त्यामुळे, ती घरातून बाहेर जाते आणि रात्री झोपायला घरी येते, असे या वृद्ध महिलेचा मुलगा अशोक खंदारे यांनी सांगितले.
दरम्यान, ज्यांनी हा फोटो काढला ते फोटोग्राफर महेश यांनीही हे वृत्त निराधार असल्याचं स्षष्ट केलंय. कारण, मी या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे, पोलिसांनी अनेक भाजी विक्रेत्यांना तेथून हलवलं. तसेच, त्या आजीलाही जाण्याचं सांगितलं होतं. पण, आजी तेथून जायला तयार नव्हत्या. त्यामुळे, पोलीस या आजीला समाजावून सांगत होते, त्यावेळेस मी हा फोटो काढल्याचे महेश गोहिल यांनी म्हटले आहे.