लखनौ : उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातल्या हलदौर नगरपालिकेतील हरविंदर उर्फ सनीसिंग या नगरसेवकाने रेल्वे यंत्रणा व पोलिसांना हैराण करुन सोडले आहे. २०१५ पासून रेल्वेमध्ये प्रवाशांना लुबाडल्याचे १४ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यातील एक चोरी त्याने मुंबई सेंट्रल-इंदूर एक्स्प्रेसमध्येही केली होती. फरार असलेल्या हरविंदरला अटक करण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून एसी कोचचे रितसर तिकिट काढून देशातील विविध भागांत हरविंदर रेल्वे प्रवास करतो. डब्यातील प्रवासी रात्री झोपी जायची वाट पाहातो. गाढ निद्रेत असलेल्या प्रवाशांजवळील मौल्यवान वस्तू चोरुन तो त्याच रेल्वेगाडीतून जनरल डब्यातून प्रवास करणाºया आपल्या सहकाºयाकडे देत असे. त्यानंतर तो तेथून पसार होऊन घरी परतत असे. अशाच एका प्रकरणात त्याला विजयवाडा पोलिसांनी पकडले व ७० लाख रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत केले.८ जून रोजी हरविंदरने मुंबई सेंट्रल-इंदूर अवंतिकामध्ये एका प्रवाशाचे ३२ बोअरचे पिस्तुल, काडतुसे, १.९० लाख रुपयांची रोकड लांबविली होती. उज्जैन येथे रेल्वे पोलिसांकडे प्रवाशाने तक्रार केली. मुंबई सेंट्रल स्थानकावरील सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे त्या गाडीने प्रवास करणाºया हरविंदरची ओळख पटविण्यात आली आहे. तो नगरपालिकेच्या डिसेंबर २०१७ साली झालेल्या निवडणुकीत हरविंदर हा अपक्ष म्हणून उभा राहिला होता व निवडूनही आला होता. (वृत्तसंस्था)
चोऱ्या करणा-या नगरसेवकामुळे पोलीस हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 4:48 AM