UP Crime : उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उत्तर प्रदेशसह दिल्लीतही अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुडघाभर साचलेल्या पाण्यात लोकांची मदत करण्याऐवजी तरुणांनी महिलेची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोहम्मद अरबाज, विराज साहू, पवन यादव आणि सुनील कुमार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
उत्तर प्रदेशच्या राजधानीत आंबेडकर पार्कसमोरील रस्त्यावर पावसानंतर पाणी तुंबले होते, त्यानंतर तेथे तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला. मात्र मजामस्ती करणाऱ्या या तरुणांनी बाईकवरुन जाणाऱ्या महिलेसोबत अतिशय घृणास्पद प्रकार केला. बाईकवरून जात असलेल्या महिलेसोबत या तरुणांनी गैरवर्तन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ही बाब मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस उपायुक्त यांना कर्तव्यावरुन हटवण्यात आले आहे. यासोबतच स्थानिक प्रभारी निरीक्षक, चौकी प्रभारी आणि चौकीवर उपस्थित असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लखनऊमधल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात कारवाईला वेग आला आहे.
लखनऊच्या आंबेडकर पार्कसमोर ही धक्कादायक घटना घडली. व्हिडिओमध्ये महिला एका व्यक्तीसोबत बाईकवरुन गुडघाभर पाण्यातून जात होती. त्यावेळी साचलेल्या पाण्यात मस्ती करणाऱ्या तरुणांनी त्यांना अडवलं. महिलेला पाहून तरुणांनी तिच्यावर घाण पावसाचे पाणी उडवण्यास सुरुवात केली. बाईक पुढे जात असल्याचं पाहून तरुणांनी बाईक मागे खेचली. बाईक मागे खेचल्याने ती एका बाजूला झुकली आणि इतक्यात एकाने मागे बसलेल्या महिलेला खेचून पाण्यात पाडलं. या घटनेचा व्हिडिओ त्यानंतर तुफान व्हायरल झाला. महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक केली जात होती.