"आरोपीला गोळ्या घाला, नाहीतर मला"; जवानाच्या पीडित मैत्रिणीची अवस्था पाहून पोलिसही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 11:22 AM2024-09-13T11:22:04+5:302024-09-13T11:25:43+5:30
मध्य प्रदेशात लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला आणि त्यांच्या एका मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
MP Crime :मध्य प्रदेशातील महूमध्ये प्रशिक्षणार्थी सैन्य अधिकाऱ्यांना मारहाण करत त्यांच्यासोबत असलेल्या तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दोन अधिकाऱ्यांवर हल्ला आणि त्यांच्या एका मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणारे आणि मैत्रिणींपैकी एकीवर बलात्कार करणारे आरोपी बाईकवर कोणाला तरी लुटण्यासाठी फिरत होते. आरोपींनी चौघांना मारहाण करत १० लाख रुपये न दिल्यास या दोघांनी जीवे मारण्याची धमकीही दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. आता या प्रकरणातील पीडितेने आरोपीला गोळी घाला, नाहीतर मला मारा, असे म्हणत आपला रोष व्यक्त केला आहे.
महू येथील आर्मी फायरिंग रेंजमध्ये मैत्रिणींसोबत बसलेल्या प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला, दरोडा आणि बलात्काराच्या बातम्यांनी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी रितेश याला पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा मानपूरच्या जंगलातून पकडले. रितेश हा जंगलात लपून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. याआधीही अनिल आणि पवन या दोन आरोपींना पकडण्यात आले असून, त्यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. मुख्य आरोपी अनिल आणि रितेश यांनी सांगितले होते की, तुम्हाला जे सापडेल त्याला सोडू नका, असं चौकशीदरम्यान पवनने सांगितले. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग होता, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे, कथित बलात्कार पीडितेने तिचा जबाब नोंदवण्यास नकार दिल्याने पोलिसांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. एका लष्करी अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पीडित मैत्रिणीसोबत गैरव्यवहार केला. मला शंका आहे की, तिच्याबरोबर काहीतरी वाईट घडले आहे, असे तक्रारदार लष्करी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. पीडितेची वारंवार समजूत घालूनही तिने अद्याप जबाब नोंदवलेला नाही. “एकतर आरोपीला गोळ्या घाला, नाहीतर मला तरी मारून टाका”, हे एकच वाक्य ती वारंवार बोलत असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे.
"ती आम्हाला फक्त एकच सांगत आहे की, आरोपीला गोळ्या घाला किंवा मला गोळ्या घाला. पीडिता सध्या जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. तिच्या परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत आम्ही वाट पाहू. अनिल, पवन आणि रितेश अशा तीन आरोपींना आम्ही अटक केली आहे. रितेश २०१९ साली एका हत्या प्रकरणातून सुटला होता. इतर तीन आरोपींचाही कसून शोध घेतला जात आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महू मिलिटरी कॅन्टोन्मेंटपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या जाम गेट या लोकप्रिय पर्यटन स्थळाजवळ बुधवारी मध्यरात्री हा सगळा प्रकार घडला. २३ आणि २४ वर्षांचे लष्करी अधिकाऱी त्यांच्या दोन महिला मैत्रिणींसोबत पिकनिकला गेले होते. दोघेही इन्फंट्री स्कूलमध्ये यंग ऑफिसर्स कोर्स करत आहेत. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास आरोपी पिकनिकच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कारमध्ये बसलेल्या अधिकारी आणि त्याच्या मैत्रिणीवर हल्ला केला. आवाज ऐकून टेकडीवर बसलेले दुसरा अधिकारी आणि त्याची मैत्रिण तिथे पोहोचली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मैत्रिणींना महू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.
"सात ते आठ जणांच्या टोळक्याने आमच्यावर लाठ्या आणि रॉडने हल्ला केला. हल्ल्यानंतर तुम्हाला काय हवे असे विचारले तेव्हा हल्लेखोरांनी त्यांना १० लाख रुपये हवेत असं म्हटलं. हल्लेखोरांपैकी एकाच्या हातात पिस्तूल होती. तसेच सर्वांनी आपले चेहरे झाकले होते. आमचे दोन साथीदार पैसे घेण्यासाठी गेले असता आरोपींनी आम्हाला बेदम मारहाण केली. तीन हल्लेखोरांनी मैत्रिणीला बाजूला नेले आणि सुमारे अडीच तास दूर ठेवले. त्यावेळी काहीतरी गडबड झाल्याचा संशय आहे," असं पीडित लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.