छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल तालिब शेख यांची पत्नी आणि मुलीची धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दोघींचीही हत्या केल्यानंतर आरोपीने त्यांचे मृतदेह त्यांच्या घरापासून सुमारे ५ किमी दूर अंतरावर नेवून फेकले. या घटनेनंतर आरोपी फरार असून, संतप्त जमावाने आरोपीचं घर आणि गोदामाबाहेर असलेल्या वाहनांना आह लावली आहे. एवढंच नाही तर आरोपी कुलदीप साहू हा काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचा दावाही केला जात आहे. दरम्यान, संतप्त जमावाने या घटनेच्या विरोधात सूरजपूर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. तसेच एडीएम यांनाचाही पाठलाग करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. तणावपूर्ण परिस्थिती विचारात घेऊन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिनुसार आरोपी कुलदीप साहू हा रात्री शहरामधील चौपाटीवर असताना त्याचा एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद झाला होता. त्या रागातून आरोपी साहू याने त्या पोलिसावर हॉटेलमधील तेलाने भरलेली कढई फेकली होती. त्यात सदर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तो पोलिसांपासून वाचण्यासाठी तिथून फरार झाला होता.
तसेच स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने वाटेत पोलीस हेड कॉन्स्टेबल तालिब शेख यांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलीस हेड कॉन्स्टेबल तालिब शेख हे आरोपीला पकडण्याची तयारी करत असतानाच आरोपीने त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी आणि मुलीची धारदार हत्याराने वार करून हत्या केली.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना एसपी एम. आर. अहिरे यांनी सांगितले की, आरोपी कुलदीप साहू याला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून सूरजपूर जिल्ह्याला लागून असलेल्या वेगवेगळ्या भागांसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही आरोपाचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच सायबर सेलच्या मदतीनेही आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, आरोपी कुलदीप साहू याचं एक ओळखपत्र समोर आलं आहे. त्यानुसार पदयात्रेदरम्यान, आरोपी कुलदीप साहू हा काँग्रेसच्या एनएसएयूआयचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याने ज्या वाहनातून पोलिसांवर गोळीबार केला. त्यावर एनएसयूआयच्या जिल्ह्याध्यक्षांचा बोर्ड लागलेला होता.