नवी दिल्ली - दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या अटकेचं प्रकरण तीन राज्यांच्या पोलिसांसाठी नसती आफत बनला आहे. आज सकाळी जनकपुरीमधून सकाळी सव्वा आठ वाजता सुरू झालेला पकडा पकडीचा खेळ सात तास सुरू होता, अखेर या नाट्यानंतर संध्याकाळी दिल्लीला परतले आहेत.
आज सकाळी दिल्लीमध्ये येत पंजाबपोलिसांनी बग्गा यांना अटक केली. त्यानंतर ते बग्गा यांना मोहालीला घेऊन निघाले होते. मात्र दिल्ली पोलिसांच्या सांगण्यावरून हरियाणा येथील कुरुक्षेत्र येथे पंजाब पोलिसांचा ताफा रोखण्यात आला. त्यानंतर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी बग्गा यांना पंजाब नाही तर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्याची घोषणा केली. त्यानंतर तशी कारवाई झाली आणि दिल्ली पोलीस बग्गा यांना घेऊन दिल्लीत आले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पंजाब पोलीस पंजाब-हरियाणा हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, हरियाणा पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने कामात अडथळा आणल्याचा पंजाब पोलिसांचा आरोप आहे.
दरम्यान, बग्गा यांच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, काही लोकांनी त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. त्यानंतर बग्गा यांना आपल्यासोबत घेऊन गेले. या तक्रारीच्या आधारावर पंजाब पोलिसांच्या जवानांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याात आला.
आम आदमी पक्षाचे नेते डॉ. सनी सिंह यांच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पंजाब पोलीस तेजिंदरपाल सिंह बग्गा यांचा शोध घेत होते. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या विधानावर टीका केली होती. तसेच केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांचे विरोधक म्हटले होते. त्यानंतर बग्गा यांच्याविरोधात पंजाबमध्ये गुन्हा दाखल झाला होता.