दार्जिलिंग : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये डोंगरी भागात लपून बसलेला गोरखा जनमुक्ती मोर्चाचा (जीजेएम) प्रमुख बिमल गुरुंग याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुरुंग समर्थकांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक अमिताभ मलिक यांचा मृत्यू झाला, तर अन्य चार पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.या गोळीबारात आमचे तीन समर्थक मारले गेल्याचा दावा जीजेएमने केला आहे. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. पोलिसांनी सांगितले की, दार्जिलिंगच्या डोंगरी भागात पातलेबासजवळ गुरुंग लपून बसल्याची माहिती मिळाली होती. गुरुंगविरुद्ध मागील महिन्यात लुकआउट नोटीस जारी झाली आहे. त्यानंतर या भागात छापे टाकण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या समर्थकांनी आणि गुरुंगच्या समर्थकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर गोळीबार केला. यात पोलीस उपनिरीक्षक अमिताभ मलिक यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला, तर अन्य चार पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावरुन सहा एके-४७ रायफल आणि एक ९ एमएमची पिस्तोल जप्त करण्यात आली आहे. या ठिकाणी संघर्ष सुरूच आहे. गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही पूर्ण परिसराला घेरले आहे. छापे टाकणे सुरूच आहे. गुरुंग हा याच भागात लपला असल्याचा दावा पोलीस करत आहेत. या भागात १०४ दिवस चाललेला बंद संपल्यानंतरची ही पहिली हिंसक घटना आहे. (वृत्तसंस्था)
गोरखा समर्थकांच्या गोळीबारात पोलीस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:14 AM