मोहाली – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात पंजाब, हरियाणात शेतकऱ्यांचा आक्रोश अद्यापही सुरु आहे. माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, सुखबीर सिंग बादल आणि प्रेमसिंह चंदूमाजरा यांच्या नेतृत्वात शिरोमणी अकाली दलानी पंजाबमधील तीन तख्त साहिब येथून चंदीगडला शेतकरी मोर्चा काढला आहे. मात्र यावेळी अकाली दलाच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला चंदीगडमध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्याने तणाव निर्माण झाला आहे.
चंदीगड-झिरकपूर सीमेवर अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी बँरिगेड तोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यात अनेक कार्यकर्ते जखमी झालेत. त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अकाली दलाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चंदीगडच्या सर्व सीमा पोलिसांनी सील केल्या आहेत. सीमेवर सुमारे २४०० जवान तैनात करण्यात आले आहेत. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पाण्याचे फवारे आणि लाठीचार्जचाही उपयोग केला.
मोहालीमध्येही कडक सुरक्षा बंदोबस्त आहेत. चंदीगडमध्ये रॅपिड एक्शन फोर्स आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली ते चंदीगडकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. झिरकपूर येथे वाहतूक कोंडी झाली आहे. नव्या कृषी विधेयकाच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाचाशेतकरी मोर्चा गुरुवारी पंजाबच्या तीन तख्तापासून सुरु झाला. पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि माझा यांच्या वरिष्ठ नेत्यांनी सकाळी ९.१५ वाजता अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब येथे नतमस्तक होऊन कृषी कायद्याविरूद्ध शेतकरी मोर्चाला सुरुवात केली.
भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची युती तुटली
संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकांवरून सरकारला विरोध केल्यामुळे अकाली दल आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोन्ही पक्षांमधील युती संपुष्टात आली. शिवसेनेनंतर आता दुसऱ्या सर्वात जुना घटक पक्ष भाजपाने गमावला. भाजपा आणि अकाली दल यांची ही युती दोन दशकांहून जास्त जुनी होती. १९९२ सालापर्यंत पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपा यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी ते पुढे आले होते. दरम्यान, अकाली दल केवळ एनडीएमधील सर्वात जुन्या घटक पक्षांपैकी एक नव्हता, तर तो एनडीएमधील सर्वात जुना पक्ष होता.