श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची अपहरण करून हत्या केल्यापासून देशभरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, दहशतवाद्यांकडून आलेल्या धमक्यांनंतर काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र गृहमंत्रालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. हे वृत्त चुकीचे आणि देशविरोधी तत्त्वांकडून दिशाभूल करण्यासाठी पेरण्यात आले आहे, असे गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने सांगितले आहे. काश्मीरमध्ये आमचे ३० हजारहून अधिक एपीओ तैनात आहेत. त्यांच्या सेवाकाळाचे आकलन करून त्यांना वेळोवेळी मुदतवाढ दिली जाते. आता प्रशासकीय कारणांमुळे ज्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला नाही, अशा कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असे गृह मंत्रालयाने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जात आहे. गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण केले होते. यातील तीन पोलिसांची हत्या करण्यात आली. शोपियान जिल्ह्यातून हे चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाले होते.
जम्मू-काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे वृत्त गृह मंत्रालयाने फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 5:28 PM