इंदूर : सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या जवानांना रोखणे आणि त्यांना ठाण्यात आणणे पोलिसांनाच महागात पडले. सहकाऱ्यांवरील कारवाईमुळे संतप्त महू छावणीतील सुमारे पावणेदोनशे लष्करी जवानांनी गुरुवारी पहाटे येथील विजयनगर पोलीस ठाण्यावर हल्ला करीत धुडगूस घातला. यावेळी जवानांनी ठाण्यातील साहित्याची तोडफोड केली. यात आठ ते दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. बाहेर पडताना हे जवान पोलीस कर्मचाऱ्यांकडून एक रायफल आणि काही काडतुसेही हिसकावून सोबत नेलीे. तसेच ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेराही तोडून सोबत नेला.पोलीस अधीक्षक (पूर्व क्षेत्र) ओ. पी. त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. पहाटे ५ च्या सुमारास सुमारे पावणेदोनशे जवान दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून ठाण्यावर चालून आले आणि त्यांनी तोडफोड सुुरू केली. तीन गटात विभागून या जवानांनी पोलीस ठाणे व ठाण्याबाहेर अक्षरश: हैदोस घातला. ठाण्याच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये शिरून या जवानांनी खिडकीच्या काचा, संगणक असे जे दिसेल त्या साहित्याची तोडफोड सुरू केली. येथे हजर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जबर मारहाण केली. यादरम्यान या जवानांनी एका महिला उपनिरीक्षकासोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप आहे. केवळ एवढेच करून ते थांबले नाही, तर त्यांनी ठाण्याबाहेर उभी पोलिसांची वाहने व अन्य काही खासगी गाड्यांचीही मोडतोड केली.(प्रतिनिधी)मारहाण केल्यामुळे हल्लाबुधवारी मध्यरात्री तिघेजण मॉलबाहेर दारू पीत असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी वाद घातला. यापैकी एकाने पोलिसांचा वायरलेसही तोडला. त्यामुळे पोलीस बिथरले. त्यांनी या तिघांनाही पोलीस ठाण्यात नेले. त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. शिवाय पोलिसांच्या मारहाणीत एकाचा पायही मोडला. मात्र हे तिघेही लष्करी जवान असल्याचे कळल्यावर पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठांना माहिती देत जवानांना सोडून दिले. तिन्ही जवानांनी छावणीत परतून घडलेला प्रकार सहकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर ठाण्यावर हल्ला झाला.
पोलीस ठाण्यात जवानांचा धिंगाणा
By admin | Published: September 11, 2015 4:12 AM