नवी दिल्ली – कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीवर गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सिंधु बॉर्डरवर ठिकठिकाणी डीजे लावण्यात आला आहे. येथे बॉर्डर सिनेमातील संदेशे आते है, अशाप्रकारे गाणी वाजवली जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी हा डिजे बंद करण्याची मागणी करत आहेत. डीजेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन जारी केले आहे.
किसान मजदूर संघर्ष समितीचे पंजाब प्रदेशाध्यक्ष सतनाम सिंह पन्नू, महासचिव सरवन सिंह पंढेर, प्रदेश उपाध्यक्ष सविंद्र सिंह चताला यांनी लिखित निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की, शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यापूर्वी अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडून देणे, बॅरिकेड्ससह पाणी, इंटरनेट आणि वॉशरुमवरील बंदी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला केली आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांकडून सतत डीजे वाजवला जातोय, तो बंद केला जावा, त्यामुळे येथील परिस्थिती सर्वसामान्य राहील असं ते म्हणाले आहेत.
किसान मजदूर संघर्ष समिती पंजाबकडून दिलेल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की, संघटनेचे कायदेशीर सल्लागार आणि दिल्लीतील वकील पोलिसांकडून दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत तपास करत आहे, पश्चिम विहार वेस्ट १२ एफआयआर, अलीपूर ३५ एफआयआर, नजफगढ ७, नांगलोई ८, शाहदरा ३ आणि उत्तमनगर ८ असे एकूण ७३ एफआयआर शेतकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, २६ जानेवारीच्या हिंसक आंदोलनानंतर ज्यांनी दंगल माजवली त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात दगडफेक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून तातडीने अटक करावी, त्याचसोबत शेतकरी आणि पत्रकार मनदीप पूनिया यांची सुटका करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी नववीर सिंह यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ४ फेब्रुवारीला श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे.