ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १५ - पतीने पत्नीच्या हातातून फोन खेचून घेतला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला भोसकले. मागच्या आठवडयात बंगळुरुच्या सरजापूरा भागात ही घटना घडली. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या संजयने पत्नी इंदूच्या हातातून मोबाईल फोन खेचून घेतला. त्यामुळे संतापलेल्या इंदूने संजयवर वार केले.
या हल्ल्यात संजयच्या हाताच्या बोटांना मार लागला असून, डॉक्टरांनी त्याला सक्तीची तीन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेनंतर संजयने इंदूचा इतका धसका घेतला आहे की, त्याने थेट पोलिस ठाणे गाठून पत्नीपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. दोघांच्या लग्नाला सात वर्ष झाली असून, त्यांना एक अपत्यही आहे.
संजयने दिलेल्या माहितीनुसार मागच्या आठवडयात संजय कामावरुन घरी आला त्यावेळी त्याला इंदू मेसेज टाईप करताना दिसाली. त्याने तिथे जाऊन इंदूच्या मोबाईलवरचा मेसेज वाचला. तो मेसेज अत्यंत घाणेरडा होता. त्याने इंदूला याचा जाब विचारला. पण इंदूने काहीही उत्तर न देता मोबाईल लॉक केला. इंदू उत्तर देत नाही म्हणून त्याने फोन हिसकावून स्वत:कडे घेतला आणि जो पर्यंत समोरचा माणूस कोण होता ते सांगणार नाही तो पर्यंत फोन मिळणार नाही असे सांगितले.
त्यावर इंदू इतकी संतापली की, ती किचनमध्ये गेली व चाकू घेऊन बाहेर आली. तिने थेट संजयच्या डाव्या हातावर चाकूने वार केले असे संजयने सांगितले.इंदूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संजयला शेजा-यांनी रुग्णालयात दाखल केले तिथे त्याच्या तुटलेल्या तीन बोटांवर शस्त्रक्रिया झाली. आमच्यात वाद होते पण मुलामुळे मी शांत होतो. आता मला माझ्या पत्नीचीच भिती वाटते पुन्हा भोसकून माझी ती हत्या करेल असे संजयने सांगितले.