ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 21 - एखाद्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी ठरवलं तर काहीही करु शकतात याचा प्रत्यय क्राईम ब्रांचने आणून दिला आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात तपास करत असताना क्राईम ब्रांनचे याचं उदाहरण दिलं आहे. एका मुलीच्या हत्येचा तपास करत असताना पुराव्यासाठी पोलीस 50 मीटर खोल विहीरीत उतरले होते. या विहीरीत उतरण्यासाठी त्यांना 17 तास विहीरीच्या बाहेर उभं राहून वाट पहावी लागली. कारण पंपच्या सहाय्याने विहीरीतील सगळं पाणी बाहेर काढून विहीर कोरडी करण्यात आली. पोलीस एका मोबाईलचा शोध घेत होते जो या विहीरीत फेकून देण्यात आला होता. या मोबाईलच्या शोधासाठी पोलिसांना खूपच धावपळ करावी लागली.
पोलीस अधिका-याने सांगितलं की, "16 एप्रिल रोजी आम्हाला भिलवाडा - कोटा राष्ट्रीय महामार्गावर बासाखेडा येथे एका तरुणीचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती. ही हत्या 14 एप्रिलला झाली होती, पण आम्हाला 16 एप्रिलला याची माहिती मिळाली. तपास केला असता ही 20 वर्षीय तरुणी 14 एप्रिलपासून बेपत्ता असून रायला पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल होती".
"आम्ही कपडे आणि अंगठीच्या सहाय्याने मृतदेहाची ओळख पटवली. 14 एप्रिलला बेपत्ता झालेली तरुणी हिच असल्याची आमची खात्री पटली. हत्या करणा-याने तिचा चेहरा ठेचला असल्याने तिला ओळखणं कठीण झालं होतं", असंही अधिका-याने सांगितलं आहे.
तपासादरम्यान तरुणी उत्तरप्रदेशची राहणारी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितलं की "ती एक शिक्षिका होती. रायलामधील एका शिक्षकासोबत तिचे संबंध होते. तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न ठरवलं होतं. 6 मे रोजी तिचं लग्न होणार होतं. दुसरीकडे तरुणी आपल्या प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकत होती. प्रियकर आधीच विवाहित आणि एका मुलाचा बाप होता. दोघांमध्ये भांडण झालं असता त्याने कानाखाली मारली. नंतर धक्का मारला असता ती बेशुद्ध झाली. याचा फायदा घेत त्याने दगडाने तिच्यावर हल्ला करत हत्या केली".
आरोपीने बाईकवरुन आपलं गाव गाठलं. जाताना सोबत तरुणीची बॅग आणि फोनही घेऊन गेला. त्याने बॅग रस्त्यात टाकली आणि मोबाईल विहीरीत फेकून दिला. पोलिसांनी 17 एप्रिल रोजी आरोपीला अटक केली असता त्याने सगळ्या घटनेचा उलगडा केला.