ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ७ : बिहारमधील बारावी परीक्षेतील टॉपर्सचे अगाध ज्ञान टीव्ही वाहिन्यांनी प्रकाशात आणल्यानंतर शिक्षण मंडळाने तातडीने घेतलेल्या फेरपरीक्षेत या विद्यार्थ्यांचे खरे गुण समोर येताच त्यांचे निकाल रद्द करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. आज बिहार बोर्ड ऑफिसमध्ये पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांना बोर्ड ऑफिसमधून हाई डिस्क, मोबाइल, लैपटॉप सोबतचं इलेक्ट्रानिक्स सामान जप्त केले आहे.
माध्यमासमोर बिहारमधील १२वी कला शाखेच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलीने कॅमेऱ्यासमोर राज्यशास्त्र हा विषय पाककलेशी संबंधित असल्याचे सांगितले, तर तिच्याच कॉलेजमधील आणि विज्ञान शाखेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला पाणी व एचटूओ यांचा संबंध काय, यांसारख्या प्राथमिक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.यावेळी १२वीच्या टॉपर विद्यार्थामागील सत्य उघड झाले.
बिहारमधील १२वी कला आणि वाणिज्य टॉपर विद्यार्थांच्या या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या कमीटीने १२च्या निकालाची सीडी जप्त केली आहे. त्याचप्रमाणे बिहार विद्यालय परीक्षा समितिचे अध्यक्ष लालकेश्वर प्रसाद सिंह यांची विचारपूस केली. सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार टॉपर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआइटीची नियुक्ती केली आहे. यामध्ये ४ टीम बनवल्या आहेतय टीममध्ये १५ सदस्य सामील आहेत. यामधील एका टीमद्वारे आज बिहार बोर्डावर छापेमारी केली. छापेमारीच्या वेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.
बिहार शालेय शिक्षण परीक्षा मंडळाने (बीएसईबी) त्यांच्या महाविद्यालयांना जोरदार दणका देत त्यांची मान्यात पुढील नोटीसपर्यंत निलंबित ठेवली आहे. या परीक्षेत ६६४ पैकी ५३४ विद्यार्थ्यांनी प्रथमश्रेणी मिळविली होती. विज्ञान शाखेत सर्वप्रथम आलेल्या सौरभ श्रेष्ठ आणि त्याचा महाविद्यालयीन सहकारी राहुल कुमार यांचा विज्ञान आणि कला या शाखांमधील पहिल्या १३ टॉपर्समध्ये समावेश होता. निकाल घोषित होताच या विद्यार्थ्यांनी टीव्ही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये दिलेली उत्तरे धक्कादायक होती.
बिहारमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी १२वीची परीक्षा दिली होती. त्यातील १४ जण गुणवत्ता यादीत आले असून, गुणवत्ता यादीतील बहुतांश विद्यार्थी पाटणा शहरापासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या हाजीपूर येथील व्ही.एन. रॉय कॉलेजचे आहेत. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना साध्या प्रश्नांची उत्तरे न येणे हा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणात एकाच्या नावावर दुसऱ्याने परीक्षा दिली असेल किंवा परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका बदलल्या असाव्यात, असा संशय असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांनी सांगितले.