नवी दिल्ली - संसदेच्या लोकसभा सभागृहात घुसखोरी केल्यानंतर दिल्लीपोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून याप्रकरणी त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. संसदेची सुरक्षा भेदून घुसखोरी करणाऱ्या आरोपींनी लोकसभेत उडी मारण्याच्या योजनेशिवाय जेल लावून आत्मदहन करण्याचाही विचार केला होता. मात्र, तो विचार नंतर सोडून दिला. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. तर, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन आरोपींच्या जाळलेल्या मोबाईलचे पार्ट ताब्यात घेतले आहेत.
संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार ललित झा याच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपचे खा. प्रताप सिन्हा यांचाही जबाब नोंदविण्यात येऊ शकतो. ललित झा याला पोलिसांनी नागौर येथील घटनास्थळी नेले होते. बुधवारी ज्या ठिकाणी तो थांबला होता, तेथे त्याला नेऊन तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ललितने त्याच्यासह इतर आरोपींचे फोन नष्ट केल्याचा दावा केल्याने पोलिसांनी तेथील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी, घटनास्थळाहून जाळलेल्या मोबाईलची पाहणी करुन स्पेअरपार्टही जमा करुन घेतले आहेत. पोलिसांना ते सर्व फोन जळालेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान, ललित झा हा योजनेतील प्रमुख सुत्रधार असून त्याने सर्वच आरोपींचे फोन आपल्याकडे ठेऊन घेतले होते, जे नंतर जाळून टाकले.
जेल लाऊन आत्मदहनाचाही विचार
दरम्यान, तपासकार्याची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सांगितले की, आरोपींना त्यांचा संदेश प्रभावशाली पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवायचा होता. लोकसभेत उडी मारण्याची योजना निश्चित करण्यापूर्वी त्यांनी शरीराला अग्निरोधक जेल लावून मग पेटवून घेण्याची योजना आखली होती. मात्र, त्यामुळे माध्यमांचे त्यांच्याकडे जास्त लक्ष गेले असते, असे वाटल्यामुळे ती रद्द केली. संसदेमध्ये पत्रके वाटण्याचाही विचार केला होता.
आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी
संसदेतील सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांवर दहशतवादविरोधी कायदा (यूएपीए) व्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपी संसदेत पोहोचण्यापूर्वी गुरुग्राममध्ये विशाल शर्मा ऊर्फ विकी याच्या घरी थांबले होते. सागर शर्मा, मनोरंजन डी., अमोल शिंदे आणि नीलम देवी या चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेनंतर फरार झालेला ललित झा याने स्वतःहून दिल्लीतील कर्तव्य पथ पोलीस स्थानकात गुरुवारी आत्मसमर्पण केले.