सध्या लगेच श्रीमंत होण्याचा अनेकांची इच्छा असते. यासाठी अनेकजण शेअर बाजारात पैसे गुंतवून लवकर श्रीमंत होण्याच्या प्रयत्न करतात. पण, अनेकजण यामुळेच कमंगाल होतात. उत्तर प्रदेशमधून एक अशीच घटना समोर आली आहे. गोरखपूरच्या राजेंद्र नगर येथील एका तरुणाची फसवणूक झाली आहे. त्याने आतापर्यंत ३८ लाख रुपये गमावले आहेत पण तो अजूनही अॅपच्या जाळ्यात अडकला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या तरुणाची याआधी दोनवेळा फसवणूक झाली होती. यावेळी पोलिसांनी त्याचे पैसे परत मिळवून दिले होते.
सायबर पोलिसांनी त्याचे काही पैसे परत मिळवले, परंतु दोन्ही वेळा फसवणूक होऊनही पुन्हा त्याने तिच चूक केली. तिसऱ्यांदाही त्याने पैसे गमावले. यावेळी तक्रार करण्यास उशीर झाल्यामुळे पैसे परत मिळाले नाहीत. दुर्दैवाने, करोडपती होण्याच्या प्रयत्नात, त्या तरुणाने हे पैसे त्याच्या नातेवाईकांकडून घेतले होते, ते आता त्याच्या कुटुंबासाठी परतफेड करणे कठीण झाले आहे.
ही फसवणूक सुमारे दीड वर्षांपूर्वी तरुणाच्या मोबाईलवर एक मेसेज आल्याने झाली. तो तरुण शेअर ट्रेडिंग करायचा. त्या फसव्या व्यक्तीने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले आणि एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेतले. त्याला एक लिंक देण्यात आली आणि ट्रेडिंग करण्यास सांगितले. त्या तरुणाने आधी स्वतःच्या खात्यातून आणि नंतर वडिलांच्या खात्यातून सुमारे ८ लाख रुपये गुंतवले. ८ लाख रुपये गुंतवल्यानंतर, अॅपवर रक्कम २२ लाख रुपये दिसू लागली यामुळे त्याला पैसे मिळवण्याची इच्छा वाढली. ज्यावेळी त्याला नफा काढायचा होता तेव्हा त्याला ५ लाख रुपये देण्यास सांगण्यात आले.
रक्कम खात्यावर येत नव्हती
यावेळी त्या तरुणाने त्याच्या नातेवाईकाकडून ५ लाख रुपये घेतले आणि ते गुंतवले. यानंतर, नफा ३२ लाख रुपये दिसू लागला, पण रक्कम खात्यात येत नव्हती. त्यानंतर त्याला ५ लाख रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याने नातेवाईकांकडून पैसे घेतले आणि अनेक हप्त्यांमध्ये एकूण ३० लाख रुपये गुंतवले. त्याला अॅपवर त्याचे पैसे १ कोटी रुपये दिसू लागले, पण त्याच्या खात्यात काहीही येत नव्हते.
ही बाब त्याने त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितले. सर्वांनी त्याला समजावून सांगितल्यावर त्याने सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले आणि अर्ध्याहून अधिक पैसे परत मिळवले. त्याने पोलिसांना सांगितले की आता तो सापळ्यात अडकणार नाही.पण त्याची पैसे कमावण्याची इच्छा कमी झाली नाही. त्याच्या खात्यात पैसे परत येताच, १ कोटी रुपये मिळविण्याच्या लोभात, त्याने पुन्हा फसवणूक करणाऱ्यांनी दिलेल्या लिंकद्वारे पैसे पाठवले. पैसे हरवल्यानंतर त्याने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. यावेळीही पोलिसांनी त्याला मदत केली आणि त्याचे पैसे परत मिळवून दिले.
पण, तो व्यक्ती पुन्हा यात अडकला. आता तो दररोज सायबर पोलीस स्टेशनला भेट देत आहे आणि त्याचे पैसे परत मिळवण्यासाठी विनवणी करत आहे. मात्र यावेळी त्याने इतका उशीर केला की पोलिसही काहीही करू शकले नाहीत.