Delhi Diwali Viral Video: राजधानी दिल्लीत एका मुस्लीम दुकानदाराला दुकान बंद करण्यासाठी धमकावलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल आता पोलिसांनी घेतली आहे. दिल्लीच्या संत नगर परिसरात दिवाळीच्या दिवशी बिर्याणीचं दुकान सुरू ठेवल्यानं मुस्लिम दुकानदाराला एक व्यक्ती धमकावत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. दिल्ली पोलिसांनी व्हायरल व्हिडिओवरुन एफआयआर दाखल केली असून या प्रकरणी संबंधित कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओत धमकी देणारा व्यक्त स्वत:ची ओळख दक्षिणपंथी संघटना बजरंग दलाचा सदस्य नरेश कुमार सुर्यवंशी अशी करुन देताना दिसत आहे. संत नगर स्थित एका दुकनातील कर्मचाऱ्याला तो हा परिसर हिंदू क्षेत्र असल्याचं सांगताना दिसत आहे. कोणत्याही हिंदू सणाच्या दिवशी दुकान न उघडण्याची धमकी सूर्यवंशी मुस्लीम दुकानदाराला देत असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. सूर्यवंशीनं दिलेल्या धमकीनंतर दुकानदारानं दुकान बंद केलं होतं.
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्हिडिओची तपासणी करण्यात आल्यानंतर भारतीय दंडविधान २९५ अ अंतर्गत बुराडी पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करुन घेण्यात आली आहे.