ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - ज्या माणसानं माझ्यावर हल्ला केला त्याला पोलीसांनी जाऊ दिलं असा आरोप जेएनयू प्रकरणातील कन्हय्या कुमारने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या वकिलांच्या समितीला कन्हय्याने असं सांगितल्याचं वृत्त आहे. ही जबानी घेत असतानाचा व्हिडीयो लीक झाला असून यामध्ये कन्हय्या कुमारने वकिलांच्या समितीला काय सांगितलं हे दिसत आहे.
सुनावणीसाठी कोर्टात नेण्यात येत असताना मला मारहाण करण्यात आली असं कन्हय्यानं म्हटलं आहे. वकिलांच्या कपड्यात असलेला जमाव मला मारण्याच्या उद्देशानेच आला होता आणि त्यांनी मला व पोलीसांनाही जबर मारहाण केल्याचे कन्हय्याने सांगितले. ज्यावेळी त्यांनी एका हल्लेखोराला ओळखलं त्यावेळी पोलीसांनी त्याला न थांबवता जाऊ दिल्याचा आरोपही त्याने केला आहे.
9 फेब्रुवारीच्या वादग्रस्त कार्यक्रमाप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा कन्हय्या कुमारवर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारी व 17 फेब्रुवारी रोजी कोर्टामध्ये हिंसक प्रकार घडले ज्याचा देशभरात निषेध करण्यात आला. वकिलांनी पत्रकार, जेएनयूचे विद्यार्थी अशा अनेकांना भर कोर्टाच्या आवारात खुलेआम मारहाण केली.
भाजपाचे आमदार ओ. पी. शर्मा यांच्यासह चार वकिलांना अटक करण्यात आली, परंतु नंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले.