नवी दिल्ली - राष्ट्रीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर ऑलिंपिक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी बृजभूषणसिंह यांच्यावर पैलवानांच्या मागणीनुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, जोपर्यंत बृजभूषण यांना अटक होत नाही, तोपर्यंत आपण आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. त्यातच, सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, याच दिवशी दुसरीकडे जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांचे सामान जंतर मंतरवरुन हटवले आहे. तसेच तंबू काढून टाकण्यात आले आहेत.
रविवारी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून ते आंदोलक खासदार बृजभूषणसिंह यांच्या अटकेसाठी आंदोलन करत आहेत. आता, त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचीही नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनही हटवले आहे. तसेच, याठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी नसल्याचे सांगत, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलकांचे सामानही हटवले आहे.
पैलवानांकडून पुन्हा आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आल्यास, जंतरमंतर ऐवजी इतरत्र ठिकाणी त्यांना आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे दिल्लीचे डिप्युटी कमिश्नर ऑफ पोलीस सुमन नाल्वा यांनी म्हटलं आहे. पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात जेवढ्या अटी व शर्ती ठेवल्या होत्या, त्या सर्वांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे, पैलवानांना आता जंतर-मंतरवर आंदोलनाची परवानगी देण्यात येणार नाही, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले. दरम्यान, आंदोलकांचे तेथील सामानही हटविण्यात आले आहे.
विविध कलमान्वये गुन्हा
या घटनेनंतर आता पोलिसांनी महिला कुस्तीपटूंना सोडून दिले असले तरी साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कलम, १८८, १८६, १४७, १४९, ३३२, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पैलवान आणि आंदोलकांवर प्रिवेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्टच्या कलम ३ अन्वये म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्यासंदर्भातील गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी दोषी आढळल्यास ५ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते.