नेपाळच्या एका हॉटेलमध्ये काही वर्षांपूर्वी महिलांसोबत आपत्तीजनक स्थितीत बिहारमधील न्यायपालिकेचे तीन अधिकारी सापडले होते. या तिन्ही अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बिहार राज्यातील सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातीच शासन निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारने बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हरि निवास गुप्ता, जितेंद्र नाथ सिंह आणि कोमल राम यांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या निर्णयात, पाटणा उच्च न्यायालयाच्या एका पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यानुसार, 12 फ्रेबुवारी 2014 पासून न्यायपालिकेतील या तिन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच, सेवानिवृत्तीनंतरच्या कुठल्याही सुविधेचा लाभ या अधिकाऱ्यांना मिळणार नसल्याचंही यात सांगण्यात आलंय. याप्रकरणातील हरि निवास गुप्ता त्यावेळी समस्तीपुरात कुटुंब न्यायालयात मुख्य न्यायाधीश होते. जितेंद्र नाथ सिंह हे अररिया जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश होते, कोमल राम हे अतिरिक्त न्यायाधीश आणि चीफ ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट होते.
पोलिसांच्या छापेमारीत हॉटेलमध्ये आढळले
नेपाळपोलिसांच्या हद्दीतील विराटनगर येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकला होता, त्यावेळी या तिन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. नेपाळच्या एका वर्तमानपत्रात यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाली होती, त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर, पटणा उच्च न्यायालयात या तिन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरु करण्यात आली. त्यामध्ये, ते दोषी आढळल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही या तिन्ही न्यायाधीशांचे अपील फेटाळून लावले होते.