आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमधील वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर जोरदार निदर्शनं केली जात आहेत. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाऊ नये, अशी मागणी विद्यार्थी सातत्याने करत आहेत. त्याचवेळी या प्रकरणावरून राजकारणही तापलं आहे.
पोलिसांनी याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केला आहे. वॉशरुममध्ये कोणताही छुपा कॅमेरा सापडला नसल्याचं सांगितलं. या संदर्भात पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी केलं, त्यानुसार मुलींच्या हॉस्टेलमधून कोणताही कॅमेरा सापडला नाही आणि त्याचा कोणताही पुरावा नाही. पोलिसांनी हॉस्टेलमधील मुलींना या प्रकरणाची अजिबात चिंता करू नका, असं सांगितलं आहे.
कृष्णा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गंगाधर राव यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरूममध्ये हिडन कॅमेरा सापडल्याच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. आरोपांच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. विशेष तपास अधिकारी म्हणून एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि पाच सदस्यीय पथक या प्रकरणाचा तांत्रिक तपासही करत आहे. संशयास्पद लॅपटॉप, मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटचाही तपास केला जात आहे.
राज्याचे मनुष्यबळ विकास मंत्री नारा लोकेश यांनी या कथित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. दोषी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. महाविद्यालयांमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत असं म्हटलं आहे.