नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेग मंदावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नव्या रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. देशातील एकूण रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,346 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान काही राज्यांमध्ये मात्र कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच कोरोनाची लागण झालेले 5 पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नैनीतालमधून कोरोना संक्रमित 5 पर्यटक अचानक गायब झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाच जण उत्तराखंड फिरण्यासाठी आले होते. त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पाच पर्यटकांची दिल्लीमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी नैनीताल फिरण्यास आलो असल्याचं सांगितलं होतं.
पर्यटक बेपत्ता असल्याचं समजताच आरोग्य विभागात खळबळ
पर्यटकांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्ली आरोग्य विभागाने या लोकांशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र कोणत्याच पर्यटकाचा फोन अद्याप लागलेला नाही. ज्यानंतर ही माहिती नैनीतालमध्ये पाठवण्यात आली. कोरोना संक्रमित पर्यटक बेपत्ता असल्याचं समजताच उत्तराखंडच्या आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. गायब झालेल्या पर्यटकांचा तातडीने शोध घेण्यात येत आहे. पोलीस या लोकांचा शोध घेत आहेत पण फोन लागत नसल्याने त्यांच्याशी संपर्क करण्यात अडचण येत आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने कोरोनाचा धोका देखील आता वाढला आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाची तिसरी लाट ठरेल जीवघेणी, 'ही' आहेत कारणे; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत गेली तर काही राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते असं म्हटलं आहे. संशोधकांनी सुट्टीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या संमेलनांमुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात. प्रवासावर भर देत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की काही राज्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती भीषण असू शकते. तज्ञांनी अलर्ट दिला असून सुट्टीचा कालावधीत संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता 103 टक्क्यांनी वाढवू शकते आणि त्या लाटेत संक्रमणाची प्रकरणे 43 टक्क्यांनी वाढू शकतात. संशोधकांनी 'ओपीनियन पीस' मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. तिसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिघडू शकते असं म्हटलं आहे.