हैदराबाद - तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुर आहे. दोन्ही राज्यातील नदी आणि नाल्यांना पूर आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे, जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांची मोठी गरैसोय होत आहे. त्यातच, पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तेलंगणा पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने गावातील एका महिलेला ट्रॅक्टरमधून रुग्णालयात दाखल केले. पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत पोलिसांनी हे धाडसी काम केलंय.
राज्यात आणखी दोन असाच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामाना खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे, नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे. त्यातच, मंचेरियल जिल्ह्यात पोलिसांच्या खाकी वर्दीला माणूसकीचे दर्शन घडले. पुराच्या पाण्यामुळे गावातून शहराकडे येणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. मात्र, गरोदर महिलेला प्रसुतीच्या कळा जाणवू लागल्याने नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने महिलेला कोटापल्ली येथील रुग्णालयात पोहोचवले. पाण्याचा प्रवाह असल्याने वाहनं वाहून जाण्याची शक्यता दाट होती. त्यामुळे, पोलिसांनी चक्क ट्रॅक्टरचा वापर करुन पाण्यातून मार्ग काढला.
पोलीस आणि नातेवाईकांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले, अखेर गरोदर महिलेला रुग्णालयात सुखरुप दाखल करण्यात आले. पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसी बाण्याचं गावकऱ्यांनी कौुतक केलंय.