नवी दिल्ली - दोन वेगवेगळया प्रकरणात आरोपी असलेली स्वंयघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँ ला दिल्ली पोलिसांनी स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचे समोर आले आहे. हुंडयासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे माँ ची दिल्लीच्या विवेक विहार पोलीस स्टेशनमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आली. विवेक विहार पोलीस स्थानकाचे स्टेशन हाऊस अधिकारी यांनी चक्क आपली खुर्ची राधे माँ ला बसण्यासाठी दिली तसेच तिने दिलेली लाल चुनरी आपल्या गळ्यात घातली.
राधे माँ चा दरबार भरतो तेव्हा तिचे भक्तगण लाल चुनरी गळयात घालून फिरत असतात. पूर्व दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये फुल उधळून राधे माँ चे स्वागत करण्यात आले. राधे माँ पोलीस स्टेशनमध्ये एसएचओ अधिका-याच्या खुर्चीवर बसली आहे आणि अधिकारी हात जोडून तिच्या शेजारी उभा आहे.
हुंडयासाठी छळ केल्याच्या प्रकरणात आरोपींच्या यादीतून आपले नाव वगळावे यासाठी राधे माँ ने मागच्या महिन्यात याचिका दाखल केली होती. पण मुंबईतील कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली. मुंबईतील रहिवाशी निक्की गुप्ताने 2016 मध्ये दाखल केलेल्या तक्रारीत आरोपींच्या यादीत राधे माँ चे ही नाव दिले होते.
दोन वर्षांपूर्वी या प्रकरणी तक्रार दाखल झाली. आध्यात्मिक गुरू राधे माँ उर्फ सुखविंदर कौरने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपण निर्दोष असल्याचे सांगताना तिने प्रसारमाध्यमे आणि पोलिसांकडून आपला छळ होत असल्याची मुक्ताफळे उधळली होती. आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला होता.
भक्त मला श्रेय देतातस्वत:ला दुर्गादेवीचा अवतार समजणाऱ्या राधे मॉँला त्याबाबत विचारणा केली असता, ती म्हणाली, माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी मी प्रार्थना करते, देव त्यांची इच्छापूर्ती करतो. मात्र भक्त त्याचे श्रेय मला देतात, हे भक्तांचे आपल्यावरील प्रेम आहे, असे मी मानते.