बिजनोर: नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक पोलिसांकडून देशभरात कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत एका ट्रक चालकाला दोन लाख रुपयांचा दंड भरावा लागला होता. यानंतर आता उत्तर प्रदेशमधल्या बिजनोरमधील पोलिसांच्या अजब कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. साहसपूर जिल्ह्यात पोलिसांनी मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत चक्क एका बैलगाडी चालकाला दंड ठोठावला आहे. मात्र त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. साहसपूरचे रहिवासी असलेल्या रियाज हसन यांची बैलगाडी शनिवारी त्यांच्या शेताच्या शेजारी उभी होती. तितक्यात सहपोलीस निरीक्षक पंकज कुमार यांच्यासह एक पथक त्या ठिकाणी पोहोचलं. गस्त घालणाऱ्या पोलीस पथकानं आसपास पाहणी केली. त्यावेळी त्यांना बैलगाडीजवळ कोणीही आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी काही ग्रामस्थांकडे बैलगाडीबद्दल विचारणा केली. यानंतर पोलीस थेट हसन यांच्या घरी पोहोचले. त्यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम ८१ नुसार हसन यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला. हसन यांनी दंड भरण्यास स्पष्ट नकार दिला. मी माझ्या शेताच्या बाहेर बैलगाडी उभी केली होती. त्यामुळे दंड कशाला भरायचा? मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत बैलगाडीवर कारवाई कशी होऊ शकते?, असे प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारले. यानंतर पोलिसांनी त्यांना ठोठावलेला दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हसन यांना दिलासा मिळाला.अवैध वाळू उपसा होत असल्याच्या माहितीनंतर पोलिसांचं पथक गस्त घालत असताना त्यांना हसन यांची बैलगाडी दिसली, अशी माहिती साहसपूर पोलिसांचे प्रभारी पी. डी. भट्ट यांनी दिली. 'बहुतांश ग्रामस्थ बैलगाडीतून वाळू घेऊन जातात. शेताच्या जवळ उभ्या असलेल्या बैलगाडीचा वापरदेखील वाळूच्या वाहतुकीसाठी केला जात असावा असा संशय पोलिसांना आला. त्यामुळेच त्यांनी मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत दंडाची कारवाई केली,' असं भट्ट यांनी सांगितलं.
ऐकावं ते नवलच! मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत चक्क बैलगाडी चालकाला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 3:35 PM