इंदूर: केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील चार मंत्र्यांनी यात्रेस प्रारंभ केला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात नागरी उड्डाण मंत्री असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनीदेखील जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात केली. त्यात सहभागी होण्यासाठी गेलेले पक्षाचे वरिष्ठ नेते गोविंद मालू यांना धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी मालू यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना यात्रेत सहभागी होऊ दिलं नाही.
भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या मतदारसंघात हा प्रकार पाहायला मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस कर्मचारी गर्दी नियंत्रणात आणत होते. त्याचवेळी भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू व्यासपीठाजवळ पोहोचले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्के मारुन बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खनिज विकास परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू यांना धक्के देऊन बाहेर काढण्यात आल्याचा व्हिडीओ समोर येताच काँग्रेसनं निशाणा साधला आहे. 'इंदूर भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू यांच्यासोबत जनआशीर्वाद यात्रेदरम्यान गैरवर्तन करण्यात आलं. त्यांना पोलिसांनी धक्के मारून बाहेर काढलं. गद्दारांची पूजा होतेय आणि निष्ठा धक्के खात आहेत,' असा टोला मध्य प्रदेश काँग्रेसनं ट्विटरवरून लगावला आहे.