नवी दिल्ली - पोलिसांनी आपल्याला विजेचे झटके देऊन छळ केला आणि विरोधी पक्षांशी संबंध असल्याचे कबूल करायला लावले, असा आरोप करणारा अर्ज संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील पाच आरोपींनी दिल्ली न्यायालयात दाखल केला आहे.
आरोपी मनोरंजन डी., सागर शर्मा, ललित झा, अमोल शिंदे आणि महेश कुमावत यांनी दाखल केलेल्या अर्जात प्रत्येक आरोपीला पोलिसांनी ७० कोऱ्या पानांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, असा आरोपही करण्यात आला. “आरोपींचा यूएपीएअंतर्गत गुन्ह्याची कबुलीसाठी, विरोधी पक्षांशी असलेले संबंध यावर स्वाक्षरीसाठी छळ केला, इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले. दोन आरोपींना त्यांचे राजकीय पक्षाशी, विरोधी नेत्याशी संबंध असल्याबद्दल कागदावर लिहिण्यास भाग पाडले गेले, असे अर्जात म्हटले आहे.
कोठडीत वाढ- दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टाने संसद सुरक्षा भंग प्रकरणातील सहा आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १ मार्चपर्यंत वाढ केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांनी हा आदेश दिला. - सर्व आरोपींची कोठडी २७ जानेवारी रोजी संपणार होती; परंतु पोलिस बंदोबस्त नसल्याने त्यांना न्यायालयात हजर करता आले नाही. यूएपीएच्या कलम १६ ए अंतर्गत आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.