ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 2 - पोलिसांनी तपासाच्या नावाखाली आपल्याला कपडे उतरवायला लावले असल्याचा आरोप 14 वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेने केला आहे. पीडित मुलीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्याय मागितला आहे. "तुझ्यावर बलात्कार झाला आहे की नाही हे आम्हाला पाहायचं आहे असं सांगत मला कपडे उतरवायला लावले", असल्याचं पीडित मुलीने आरोपात म्हटलं आहे. यावेळी एका पोलीस कर्मचा-याने आपल्याला जाणुनबुजून हात लावल्याचंही तिने सांगितलं आहे.
पीडित तरुणीने केलेल्या याचिकेची दखल घेत न्यायाधीश रेखा मित्तल यांनी नोटीस जारी करत पुढील सुनावणीच्या आधी आपलं उत्तर द्यावं असा आदेश हरियाणा डीजीपींना दिला आहे. 5 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.
पीडित मुलीने 20 नोव्हेंबर 2016 रोजी बलात्काराची तक्रार नोंद केली होती. आपण आरोपीला ओळखत असल्याचं ती सांगत आहे. यानंतर न्यायदंडाधिका-यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी तिने पोलिसांनी आपल्यासोबत केलेल्या गैरवर्तवणुकीची माहिती दिली. मात्र अद्याप पोलिसांविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
आपल्या वडिलांच्या मदतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत पीडित मुलीने सांगितलं आहे की, "23 नोव्हेंबरला पोलीस आरोपीसोबत तिला सीआयए कार्यालायत घेऊन गेले. तिथे पोलिसांनी जे केलं ते बलात्कारापेक्षाही अपमानास्पद होतं. पोलीस कर्मचा-याने शर्टचे बटण काढून बलात्कार झाला आहे की नाही दाखल असं सांगितलं", असल्याचं मुलीने सांगितलं आहे. पोलिसांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.