वाराणसी - राज्य सरकार जंगलराज असल्याचा आरोप उत्तर प्रदेश सरकारवर विरोधकांकडून नेहमीच करण्यात येतो. त्यात, पोलिसांना हाताशी धरुन सरकार सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत अस्याचाही आरोप कोरोना कालावधीत करण्यात आला. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसते. त्यामुळे, उत्तर प्रदेश पोलीस नेहमीच सोशल मीडियावरही नेटीझन्सच्या निशाण्यावर असते. आताही युपी पोलिसांच्या एका निर्दयी कृत्यामुळे नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका गरीब कुटुंबीयांवर कारवाई करताना पोलीस हवालदारांमध्ये माणूसकी शिल्लक राहिली नसल्याचे दिसून येते. एका चिमुकल्या बाळाला उचताना चक्क एका हाताने अतिशय निर्दयीपणे पोलीस शिपायाने त्याच्या आईकडून हिसकावून घेतले आहे. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, दोन पोलीस शिपाई दिसत असून एका गरीब कुटुंबीयांवर कुठल्यातरी गुन्ह्यासंदर्भात कारवाई करताना दिसत आहेत. मात्र, ही कारवाई करताना पोलिसांच्या संवदेना हरवल्याचंही स्पष्ट होत आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल फोटो पाहून नेटीझन्सच्या काळजाचं पाणी-पाणी होत आहे. तर, पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित युपी पोलीस दलातील या हवालदारांवर कारवाई करण्याची मागणी नेटीझन्स करत आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील ही घटना असल्याचे प्राथमिक माहितीवरुन समजत आहे. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या योगिता भयाना यांनी हे फोटो ट्विट करुन पोलीसावर कारवाईची मागणी केली आहे.