ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले जेएनयूचे विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनी पोलिसांकडे सिगारेटची पाकिटे, वर्तमानपत्र आणि कन्हैया कुमारसोबत ठेवण्याची मागणी केली आहे.
चौकशीत पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्यापूर्वी त्यांनी या तीन मागण्या केल्या. ९ फेब्रुवारीला देश विरोधी घोषणा दिल्या म्हणून खालिद आणि अनिर्बनवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या ते पोलिस कोठडीत असून, कन्हैया कुमारलाही एकदिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
खालिदला धुम्रपानाची सवय आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी खालिदने शेवटची सिगारेट ओढली होती असे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. खालिदची सिगारेटच्या पाकिटाची मागणी फेटाळून लावण्यात आली.
गुरुवारी दुपारी दोघांनी जेवणाची विनंती केल्याचे पाहून पोलिसांना आश्चर्य वाटले. जेएनयूमधील ढाब्यावरुन मोमो आणि बिर्यानी आणून देण्याची त्यांनी पोलिसांना विनंती केली. पण पोलिसांनी त्यांची एकही मागणी मान्य केली नाही. त्यांना पोलिस स्थानकाजवळच्या एका भोजनालयातील जेवण देण्यात आले.