नवी दिल्ली, दि. 19- जगभरात आतापर्यंत काही मुलांचे जीव घेणाऱ्या तसंच भारतातही दहशत निर्माण करणारा 'ब्ल्यू व्हेल' हा ऑनलाइन गेम आता पोलीस खेळणार आहेत. हा गेम खेळणारा आत्महत्येसाठी का प्रवृत्त होतो? गेमचा अॅडमिन त्याला नेमका कसा जाळ्यात अडकवतो? या सगळ्या मुद्द्यांचा तपास करण्यासाठी 'ब्ल्यू व्हेल'चं आव्हान स्वीकारण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे.
'ब्ल्यू व्हेल' गेममुळं मुंबईत एका मुलानं आत्महत्या केल्याचा संशय आहे. तर, काही ठिकाणी या गेममुळे अनेक मुलांनी घरं सोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस सावध झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तज्ज्ञांची टीम हा खेळ खेळणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ब्ल्यू व्हेल' गेमच्या सॉफ्टवेअरचा बारकाईनं अभ्यास केला जाणार आहे. गेमचा अॅडमिन कुठल्या टप्प्यावर काय सूचना देतो, नेमक्या कुठल्या टप्प्यावर गेम खेळणारा त्याच्या जाळ्यात अडकतो, याचा शोध पोलीस घेणार आहेत.
आम्ही आमच्या स्तरावर बारकाईने या खेळाचा अभ्यास सुरू केला असून या गेममुळे कुणाचा जीव जाऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. दिल्लीत अजून तरी 'ब्ल्यू व्हेल'मुळं कुठलीही दुर्घटना घडलेली नाही. तरीही आम्ही खबरदारी घेण्याचं ठरवलं आहे. पालकांना या गेमचे धोके पटवून सांगणं हाही यामागचा एक उद्देश आहे, असं दिल्लीचे पोलीस उपायुक्त (सायबर क्राइम) एनेश राय यांनी सांगितलं. सोशल मीडियावर सुरू असणारे ट्रेण्ड आणि व्हॉट्सअॅप ग्रुपही पोलिसांकडून मॉनिटर केले जात आहेत.
मुलं जर मोबाईलवर जास्त वेळ गेम खेळत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवा, असं आवाहन पोलिसांनी पालकांना केलं आहे. ब्लू व्हेल गेम हा डाऊनलोड होत नसून तो अॅडमिनद्वारे खेळला जातो. ब्लू व्हेल गेम खेळण्याच्या पोलिसांच्या या निर्णयाने ते अॅडमिनच्या मुलांना फसविण्याच्या पद्धतींचीही माहिती मिळविणार आहेत. हा गेम एकदा खेळायला सुरू केला तर तो आर्धवट सोडता येत नसल्याचं सूत्रांचं मत आहे. जर हा गेम आर्ध्यावर सोडला तर अॅडमिनकडून मुलांना धमकविण्यात येतं. कुटुंबातील सदस्याला त्रास दिला जाईल, अशी धमकी दिली जाते.
दिल्ली पोलीस ब्लु व्हेल गेम खेळून या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणार आहेत.