नवी दिल्ली : रस्त्यावर वाहने चालवताना कोणताही कायदा मोडल्यास वाहतूक पोलीस चलन कापण्यास अजिबात चुकत नाहीत. मात्र, उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने वीज कर्मचाऱ्याचे चलन कापले आणि 6000 रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना समोर आली आहे. हा दंड वीज कर्मचाऱ्याच्या मासिक पगारापेक्षा जास्त होता. यावेळी वीज कर्मचाऱ्याने वाहतूक पोलिसांची माफी मागितली तरी त्यांनी ऐकले नाही. यानंतर वीज कर्मचाऱ्याने केलेले कृत्य पाहून सगळेच चक्रावून गेले. संतप्त झालेल्या वीज कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनची लाईट तोडली.
मीडिया रिपोर्टच्या वृत्तानुसार, कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या एका वीज कर्मचाऱ्याने दुचाकी चालवताना हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे कारवाई करत पोलिसांनी 6000 रुपयांचे चलन कापले. यामुळे संतप्त होऊन वीज कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनची लाईट तोडली. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात मंगळवारी ही घटना घडली. वीज कर्मचारी मोहम्मद मेहताब म्हणाले की, 'माझा मासिक पगार फक्त 5,000 रुपये आहे आणि पोलिसांनी माझे 6000 रुपयांचे चलन कापले. मी त्या पोलीस कर्मचाऱ्यालाही मला माफ करण्याची विनंती केली, पण त्याने दया दाखवली नाही आणि माझे चलन कापले."
या घटनेबाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पोलीस ठाण्याकडे 55 हजारांहून अधिक थकबाकी होती, त्यामुळे कनेक्शन तोडण्यात आले. पीव्हीव्हीएनएल वीज कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'लाईनमध्ये काही बिघाड झाला, त्यामुळे पुरवठा खंडित झाला.' दरम्यान, या घटनेमुळे 5000 रुपयांची नोकरी करणारी व्यक्ती 6000 रुपयांचे चलन कसे भरणार आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. तर पोलिसांनी सांगितले की, वीज कर्मचारी असेल तर नक्कीच चलन कापले जाईल. हाही चर्चेचा विषय बनला आहे. याचबरोबर, वीज कनेक्शन तोडल्याने पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हाचा सामना करावा लागत आहे.