नोएडाच्या सेक्टर-63 पोलीस स्टेशनमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महेंद्र पाल यांनी पत्नीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी आपली आयुष्यभराची कमाई खर्च केली. त्यानंतर त्यांच्यासमोर एक मोठी चिंता उभी होती की आपल्या लहान मुलीचं लग्न कसं होणार? मुझफ्फरनगरमधील एका मुलाशी लग्न ठरलं आहे पण मुलीचं लग्न लावण्यासाठी पालकांकडे पैसे नाहीत. त्यांनी आपली चिंता काही पोलिसांना सांगितली. त्यानंतर जे घडलं ते कौतुकास्पद होतं.
आपल्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या महेंद्र पाल यांची चिंता दूर करण्यासाठी जवळपास 110 पोलिसांनी पुढाकार घेतला. त्यांनी परस्पर सहकार्याने पैसे उभे करण्यास सुरुवात केली. अवघ्या काही आठवड्यात पोलिसांना चार लाख रुपये जमवण्यात यश आले. त्यांनी पाल यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे तर दिलेच, पण मुलीला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी लागणारी सर्व उपकरणेही दिली. महेंद्र पाल यांच्या मुलीचे रविवारी लग्न झाले आणि या लग्नात केवळ पालच नाही तर त्यांच्या सर्व पोलिसांनी कन्यादान केले.
महेंद्र पाल (47) हे सेक्टर-63 पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी, मॉपर आणि क्लिनर म्हणून काम करतात. यासाठी त्यांना महिन्याला 6,000 रुपये पगार मिळतो. याशिवाय जवळच्या परिसराची साफसफाई करून त्यांना अतिरिक्त 2,000 रुपये मिळतात. त्यांच्या 6 जणांच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी, त्यांच्या डोक्यावर छप्पर घालण्यासाठी आणि पत्नीच्या कॅन्सरच्या औषधाची व्यवस्था करण्यासाठी सफाई कर्मचारी जेवढे कमावतात ते पुरेसे नाही.
महेंद्र पाल सांगतात की त्यांना घराचे भाडे म्हणून 8,000 रुपये द्यावे लागतात. पाल यांनी सांगितले की त्यांना दोन मुली आहेत, त्यापैकी सर्वात लहान आशू आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. याशिवाय त्यांना दोन मुलेही आहेत. धाकटा मुलगा दहावीत आहे. ते म्हणाले, 'आशूचे लग्न मुझफ्फरनगरमधील एका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणासोबत ठरवले तेव्हापासून मला काळजी वाटत होती. वर हा चांगल्या कुटुंबातील असून, त्यानेही साधेपणाने लग्न करण्याचे मान्य केले.
पाल यांनी आपली चिंता स्टेशन प्रभारी अमित मान यांना सांगितली. मान म्हणाले, “महेंद्र पाल घरी गेल्यानंतर त्या दिवशी माझी माझ्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आम्ही ठरवले. लग्नासाठी मंडप, जेवण आदी खर्चाबरोबरच पोलिसांनी नवविवाहित जोडप्याला डबल बेड, वॉर्डरोब, सोफा सेट, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, कुलर आणि टीव्ही सेट भेट म्हणून दिला. तसेच त्यांना 81 हजार रुपये रोख दिले. वधू-वरांना एसएचओकडून एक खास मोटारसायकलही मिळाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"