मनरेगासाठीच्या तरतुदीचा काँग्रेसला राजकीय लाभ? राहुल गांधींची पूर्वीपासूनच होती मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:25 AM2020-05-19T04:25:48+5:302020-05-19T05:55:42+5:30
- संतोष ठाकूर नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजच्या शेवटच्या टप्प्यात मनरेगासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा केली ...
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजच्या शेवटच्या टप्प्यात मनरेगासाठी ४० हजार कोटी रुपयांची घोषणा केली त्याचा काँगेसलाही राजकीय लाभ होऊ शकतो, असे भाजपमधील एका मोठ्या वर्गाचेच म्हणणे आहे. याचे कारण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे मनरेगासाठी सरकारकडे पूर्वीपासूनच खास पॅकेजची मागणी करत होते. आमची मागणी मान्य केल्याबद्दल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत.
भाजपच्या अनेक नेत्यांचे म्हणणे असे आहे की, असे करून जनतेच्या मनावर काँग्रेसचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. या तरतुदीबद्दल भाजप लोकांमध्ये आपली भूमिका व्यवस्थित मांडू शकला नाही तर काँग्रेस याचा लाभ घेऊ शकेल. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचे म्हणणे असे आहे की, लॉकडाऊन लागू केल्यानंतर काहीच दिवसांत काँग्रेस विशेषत: राहुल गांधी हे सरकारकडे पॅकेजची मागणी करत होते. त्यामुळे जेथे मनरेगाची कामे सुरू आहेत तेथील मजूर आणि त्यांच्या कुटुंबांत राहुल गांधी यांची स्वीकारार्हता वाढेल. काँगे्रसने याचा लाभ घेऊ नये हे भाजपला बघावे लागेल.
काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांचा हाच मुद्दा लावून धरला होता. त्यांनी मनरेगासाठीची तरतूद वाढवण्याची मागणी करताना मनरेगा मजुरांसाठी दैनिक भत्ता वाढवून मागितला होता. केंद्र सरकारने एका मागून एक या दोन्ही मागण्यांवर पावले उचलली. यामुळे शक्यता अशी वाढली की, काँग्रेस याचा राजकीय लाभ घ्यायचा प्रयत्न करेल.