कोलकाता : कोलकातामध्ये निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी गौरव दत्त यांच्या पत्नीसोबत भाजपा नेता मुकुल रॉय यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा विचार केला आहे.
1986च्या बॅचचे गौरव दत्त यांनी 19 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. गौरव दत्त यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांनी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. तसेच, ममता बॅनर्जी यांनी गौरव दत्त यांना 'कंपलसरी वेटिंग'वर ठेवले आणि 31 डिसेंबर 2018 रोजी निवृत्त झाल्यानंतर मिळणारे पैसे देखील दिले नाहीत, असे लिहिले आहे.
दरम्यान, सोशल मीडियात ही चिठ्ठी व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच, गौरव दत्त यांची पत्नी भाजपा नेते मुकुल रॉय यांच्यासह सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.