अहमदाबाद - मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीवरून झालेल्या शिक्षेस गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर आता २ मे रोजी सुनावणी होणार आहे.
शनिवारी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्यावतीने बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी काही कोणाची हत्या केलेली नाही. दोषसिद्धीस स्थगिती दिली नाही, तर त्यांना ८ वर्षांपर्यंत निवडणूक लढवता येणार नाही. राजकारणात १ सप्ताहाचा कालावधीसुद्धा दीर्घ असतो. ८ वर्षांत याचिकाकर्त्यांची राजकीय कारकीर्द संपू शकते.
सिंघवी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. हेमंत प्रच्छक यांनी आता तक्रारदाराला आपली बाजू मांडू द्या, असे सांगून २ मे रोजी पुढील सुनावणी ठेवली. मोदी आडनावावर केलेल्या टीकेवरून सुरतेच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना तत्काळ जामीनही दिला. जिल्हा न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.