नवी दिल्ली : राजकीय वर्ग आणि माध्यमांदरम्यानचे संबंध टप्प्याटप्प्याने खालावत चालले आहेत. माध्यमांमध्ये होणारी टीका राजकीय वर्ग आता सहन करु शकत नाही. अशी स्थिती असताना आदर्शवाद, राजकीय मतभिन्नता आणि वैयक्तिक संबंध यांचे संतुलन साधण्याचे कौशल्य डॉ. विजय दर्डा यांनी आपल्या पत्रकारितेत दाखवले आहे, असे प्रशंसोद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांनी काढले. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड-अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’ या नव्या पुस्तकाचे डॉ. थरूर यांच्या हस्ते नेत्रदीपक सोहळ्यात येथील ‘कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडिया’च्या स्पीकर हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी प्रकाशन झाले. डॉ. दर्डा यांनी बजावलेल्या स्वतंत्र, निष्पक्ष कामगिरीची डॉ. थरूर यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सामील होणे हा आपला सन्मान आहे, असे ते म्हणाले.
डॉ. संजय बारू : अत्यंत संघर्षपूर्ण परिस्थितीतही डॉ. दर्डा यांच्या नेतृत्वाखाली लोकमतने ध्येयवादी पत्रकारिता केली. व्यावसायिक वस्तुनिष्ठता आणि परिपक्व भूमिका घेत विविध विषयांवर त्यांनी लिखाण केले. विदर्भातील जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधताना तेलंगणाप्रमाणेच विदर्भालाही स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून डॉ. दर्डा यांनी एकहाती प्रयत्न केले.
शेखर गुप्ता : देशाची पत्रकारिता दिल्ली आणि मुंबईतील इंग्रजी माध्यमांमध्ये केंद्रित झाली असतानाही डॉ. दर्डा यांनी व्यावसायिकतेने, निष्ठेने आणि वस्तुनिष्ठपणे पत्रकारिता केली. इंग्रजांच्या काळापासून भाषिक वृत्तपत्रांची वर्नाक्युलर म्हणून हेटाळणी केली जायची. पण जगभरात सर्वत्र प्रिंट माध्यमे अस्तंगत होत चालली असताना भारतात सर्वाधिक वाढ असलेल्या भाषिक वृत्तपत्रांमुळेच आज प्रिंट माध्यमे तगून आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. दर्डा यांनी मालक-संपादक म्हणून केलेले कार्य अतुलनीय आहे.
केक कापून अभीष्टचिंतन ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सोहळ्यास सुरुवात झाली. लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा यांनी प्रकाशकांच्या वतीने पुस्तकाची प्रस्तावना केली. सोहळ्याअंती सर्व मान्यवरांनी अलीकडेच वाढदिवस साजरा केलेले डॉ. विजय दर्डा यांचे केक कापून अभीष्टचिंतन केले.
मान्यवरांची उपस्थिती समारंभाला खासदार प्रफुल्ल पटेल, डॉ. फारुख अब्दुल्ला, भर्तृहरी मेहताब, कार्तिकेय शर्मा, एन.डी. गुप्ता, कुंवर दानिश अली, वरुण गांधी, कुमार केतकर, आचार्य लोकेश मुनी, माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, माजी खासदार जे. के. जैन, माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सनदी अधिकारी साधना शंकर, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, रायन करंजीवाला, सनदी अधिकारी प्राजक्ता वर्मा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला आदी उस्थित होते. लोकमत मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी आभार प्रदर्शन केले.
देशभरातील वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित २१८ लेख
- डॉ. दर्डा यांनी २०११ ते २०१६ या कालखंडात ‘लोकमत’ तसेच देशातील प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात आहे.
- सातशे पानांच्या या पुस्तकात देशाच्या व जगाच्या सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींवर लिहिलेल्या एकूण २१८ लेखांचा समावेश आहे.
- यापूर्वी डॉ. दर्डा यांनी २००४ ते २०११ दरम्यान लिहिलेल्या लेखांचे संकलन असलेले ‘द स्ट्रेट थॉटस्’ हे पुस्तक यापूर्वी प्रकाशित करण्यात आले आहे.