पणजी - मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगात सुरु आहेत. त्यातच, काँग्रेस पक्षाने राज्यपालांना पत्र पाठवून गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. कारण, 2017 च्या निवडणुकांत काँग्रेस हा 40 पैकी 17 जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 13 जागांवर विजय मिळाला होता. इतर पक्षांनी 10 जागेवर आपले उमेदवार विजयी केले आहेत.
गोव्यातील काँग्रस आमदारांचे गटनेते सी कावेलकर यांच्या म्हणण्यानुसार, गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे यापूर्वीच आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणे गरजेचे होते. तर, सध्या गोव्यात सरकार असूनही नसल्याप्रमाणेच आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने आम्ही सरकार स्थापनेचा दावा करत असल्याचे कावेलकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरकारचे नेतृत्व कुणी करावे याबाबत भाजपच्या आमदारांमध्ये व एकूणच पक्ष संघटनेतही दोन गट आहेत. भाजपच्या तीन सदस्यीय केंद्रीय निरीक्षक समितीने आमदारांना प्रत्यक्ष भेटून व त्यांचे म्हणणो जाणून घेऊन भाजपमधील प्राप्त स्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपमधील एका गटाला नवा मुख्यमंत्री हा भाजपमधूनच निवडला जावा असे वाटते, तर दुसरा गट मात्र बाहेरून नेता आणला तरी चालेल पण बाहेरून जो नेता येईल, त्या नेत्याच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण व्हावे असा मुद्दा मांडत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपण प्रसंगी राजीनामा देण्यास तयार आहोत हे सांगितले आहे.