भोपाळ - काँग्रेसची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्यच रंगले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काठावर बहुमत असलेले कमलनाथ सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने काँग्रेसच्या १७ आमदारांना कर्नाटकमध्ये हलवले आहे. यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार सर्व आमदार हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील भाजपाचे एक आमदार काँग्रेसच्या आमदारांना घेऊन बंगळुरूला पोहोचले आहेत. तसेच या आमदारांना बंगळुरूबाहेरच्या कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, महेंद्र सिंह सिसोदिया, तुलसी सिलावट, प्रभुराम चौधरी आणि गोविंद सिंह राजपूत हे आमदार कर्नाटकात पोहोचल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या घडामोडींनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला आता स्वस्थ बसवत नाही आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांनी जो काही भ्रष्टाचार केला आहे, तो आता समोर येत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, असे कमलनाथ म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या सरकारमधील आमदारांनी बंडाळी केली होती. त्यावेळी ३ मार्च रोजी काँग्रेस, बसपा आणि सपा या पक्षांचे मिळून नऊ आमदार बेपत्ता झाले होते. मात्र त्यापैकी तीन आमदारांना दुसऱ्या दिवशी परत भोपाळला आणण्यात काँग्रेसला यश आले होते. त्यानंतर अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा, काँग्रेस आमदार बिसाहू लाल सिंह आणि रघुराज कंसाना हेसुद्धा परतले होते. मात्र काँग्रेसचे अन्य एक आमदार हरदीप सिंह डंग यांना मात्र राजीनामा दिला होता.