दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकीय उलथापालथीला सुरुवात होऊ शकते. नितीश कुमार दिल्लीतून परतल्यानंतर जेडीयूने २९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांना पदावरून हटवण्याचा निर्णय होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सध्या कुठलेही संघटनात्मक पद नाही आहे. त्यामुळे ते जेडीयूच्या अध्यक्षपाचा कार्यभार सांभाळू शकतात.
गेल्या काही दिवसांपासून ललन सिंह यांची लालूप्रसाद यादव यांच्याशी जवळीक वाढली आहे. सध्या जेडीयूमध्ये दोन शक्यता निर्माण झालेल्या आहेत. त्यामधील एक म्हणजे पक्षामधील कुठल्याही प्रकारची फूट टाळण्यासाठी नितीश कुमार हे स्वत: पक्षाचे अध्यक्ष बनू शकतात. नितीश कुमार यांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्यांती तशी इच्छा आहे. तर दुसरी शक्यता म्हणजे नितीश कुमार अशा नेत्याकडे अध्यक्षपद सोपवू शकतात. जो त्यांच्या मर्जीबाहेर नसेल. मात्र त्यामुळे पक्षामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार हे ललन सिंह यांची कार्यपद्धती आणि विशेषकरून राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी त्यांच्या वाढत असलेल्या जवळीकीमुळे नाराज आहेत. ललन सिंह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मुंगेर मतदारसंघातून लढण्यास इच्छूक आहेत. या मतदारसंघातील ते विद्यमान खासदार आहेत. मात्र आता ते आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात.
आता २९ डिसेंबर रोजी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आणि राष्ट्रीय परिषदेची जेव्हा बैठक होईल, तेव्हा ललन सिंह बाहेर होऊ शकतात, तसेच नितीश कुमार हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं अध्यक्षपद सांभाळू शकतात.
जर २९ नोव्हेंबर रोजी ललन सिंह यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं तर ते वरिष्ठ नेते असूनही नितीश कुमार यांच्यापासून वेगळे झालेल्या जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, आरसीपी सिंह, उपेंद्र कुशवाह आणि प्रशांत किशोर यांच्या पंक्तीत समाविष्ट होऊ शकतात.