तिरुवनंतपुरम - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज काँग्रेसने केली. या घोषणेबरोबरच राहुल गांधींच्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील ज्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तो मतदारसंघ भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच येथील राजकीय गणितही खास आहे. 2014 मध्ये झाली होती अटीतटीची लढतकेरळमधील वायनाड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, गेल्या दोन निवडणुकांमध्ये येथून काँग्रेसने बाजी मारलेली आहे. या मतदारसंघात तिरुवंबडी, वानदूर, सुल्तानबथेरी, एरनाड, कलपत्ता आणि निलंबूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, 2014 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला या मतदासंघातून केवळ 20 हजार 870 मतांनी विजय मिळाला होता. त्यावेळी काँग्रेसचे एम. आय. शानवाझ यांना 3 लाख 77 हजार 035 मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या एलडीएफच्या सत्यन मोकेरी यांना 3 लाख 56 हजार 165 मते मिळाही होती. तसेच भाजपाच्या पी.आस. रस्मिलनाथ यांना 80 हजार 752 मते मिळाली होती. 2009 मध्ये मात्र काँग्रेसने मिळवला होता मोठा विजय मात्र 2009 मध्ये या मतदारसंघात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी यूडीएफ(काँग्रेस) च्या एमआय शानवाझ यांनी एलडीएफच्या एम. रहमतुल्ला यांना 1 लाख 53 हजार 439 मतांनी पराभूत केले होते. त्यावेळी शानवाझ यांना 4 लाख 10 हजार 703 तर रहमतुल्ला यांना दोन लाख 57 हजार 264 मते मिळाली होती. असे आहे वायनाडमधील समीकरण2011 च्या जनगणनेनुसार वायनाड जिल्ह्याची एकूण लोकसंखा 8 लाख 17 हजार 420 एवढी आहे. त्यात 4 लाख 01 हजार 684 पुरुष आणि 4 लाख 15 हजार 736 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण 89.03 टक्के एवढे आहे. एकूण लोकसंख्येपैकी 4 लाख 4 हजार 460 (49.48टक्के) हिंदू आहेत. तर 2 लाख 34 हजार 135 (28.65 टक्के) मतदार मुस्लिम आहेत. तसेच 1 लाख 74 453 (21.34 टक्के) मतदार ख्रिश्चन आहेत.
असे आहे राहुल गांधी निवडणूक लढवत असलेल्या वायनाड मतदारसंघाचे राजकीय समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 1:09 PM